खिर्डी खुर्दमधील जि.प.शाळेची दुरवस्था
खिर्डी : खिर्डी खुर्द गावातील जिल्हा परीषद शाळेची दुरवस्था झाली असून जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे. 1957 मध्ये निंभोरा रस्त्यावर जिल्हा परीषद मराठी शाळा इमारतीची उभारणी झाली होती. आजमितीला या इमारतीला 64 वर्ष झाले असून सध्या स्थितीत उभी असलेली शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये जि.प.मराठी शाळेच्या हजेरी पटावरील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे त्यामुळे ही शाळा अखेरची घटका मोजत आहे.
अर्जाची अद्यापही दखल नाही
शाळेची इमारत धोकादायक झाली असून ग्रामपंचायतीने जिल्हा परीषद व पंचायत समिती प्रशासनास सुमारे पाच वर्षांपूर्वी जुन्या वापरात नसलेल्या पडाऊ वर्ग खोल्या पाडण्यात याव्या या संदर्भात मागणी अर्ज व ठराव दिलेला होता मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही तसेच जीर्ण व अर्धवट अवस्थेत पडलेल्या वर्ग खोल्यांचे खिडक्या, दरवाजे, फरशी हे अज्ञात लोकांनी चोरून नेले आहेत शिवाय वर्ग खोल्या केव्हा जमिनीवर कोसळतील याचा भरवसा नाही.
चिमुकल्यांचा जीव टांगणीला
अंगणवाडीतील विद्यार्थी या ठिकाणी खेळण्यास येत असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पडित अवस्थेवर असलेल्या वर्ग खोल्या पूर्णपणे पाडून नेस्तनाबूत करण्यात याव्या, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. शाळेच्या आवारात गावातील मुले जुन्या शाळेच्या ओट्यावर खेळतांना दिसून येतात तसेच छतावरील कौले पडत असून या पडक्या इमारतीचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर समस्या बनली आहे मात्र या सर्व बाबीकडे जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव दिसत आहे. तत्काळ शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह पालकवर्ग करीत आहे.


