जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे धान्य एकदाच देण्याची शिवसेनेची मागणी
प्रा.धीरज पाटील यांची जिल्हा पुरवठा अधिकार्यांशी चर्चा
भुसावळ : शहरातील श्रीनगर, भोईनगर, खळवाडी, जुना सातारा, हुडको कॉलनी, भुसावळ हायस्कूल परीसरातील ग्राहकांना रेशन दुकानांमधून जानेवारी महिन्यापासून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याकडे नागरीकांनी केल्या होत्या. 2 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्याशी प्रा.पाटील यांनी संपर्क साधला असता तांत्रिक कारणास्तव उशीर झाला असून येत्या दोन दिवसात धान्य पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन सूर्यवंशी यांनी दिले होते. मात्र 6 फेब्रुवारी पर्यंतही भुसावळातील दुकानांतून रेशनकार्ड धारकांना जानेवारीचे धान्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
एकदाच दोन महिन्याचे धान्य द्यावे : प्रा.पाटील
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मोफत आणि विकत मिळणारे धान्य एकाच वेळेस द्यावे, आधीच खूप उशीर झाला आहे, नागरीकांना विकत आणि मोफत धान्य घेण्यासाठी चार वेळेस धान्य दुकानावर जावं लागेल आणि कोरोना या अश्या प्रकारामुळे वाढू शकतो. परवाना धारक दुकानदारांची सुद्धा यात दमछाक होईल म्हणून येत्या दोन दिवसांत धान्य वाटप सुरू करावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.
सोमवारी शिवसैनिक भेटणार
जानेवारी महिन्यापासून जळगाव येथील गोदामातून शहरी भागातील रेशन दुकानांमध्ये थेट धान्य देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे पुरवठ्यात अधिक पारदर्शकता येणार आहे. मंगळवारपासून पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, रावेर लोकसभा उपजिल्हा संघटक विलास मूळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख बबलू बर्हाटे, निलेश महाजन, माजी नगरसेवक दीपक धांडे आणि सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांची भेट घेणार असल्याचे प्रा.पाटील यांनी कळविले आहे.


