कंटेनरच्या धडकेत दोघे तरुण जागीच ठार
जळगाव : मागूून भरधाव वेगात येणार्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जबर धडक देऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झाली. हा अपघात शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळ शनिवारी घडला.
जागेवरच दोघांचा मृत्यू
चोपड्याकडून तीन जण दुचाकी (एम.एच. 18 बी.व्ही. 3853) ने शिरपूरकडे जात असताना तरडी गावाच्या अलिकडे रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने दुचाकी चालक तरुणाने दुचाकी हळू केली असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघे तरुण रुग्णवाहिका येण्यापूर्वीच गतप्राण झाले. या अपघातातील दोन्ही मृत नेमके कुठले? याची रात्री उशिरापर्यंत माहिती मिळाली नसून त्यांची ओळख पटली नव्हती. तर या अपघातात यावल तालुक्यातील वाघझिरा येथील 22 वर्षीय भारती भावसिंग पावरा यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात 108 रुग्णवाहिकाद्वारे उपचारार्थ दाखल केले होते. प्रथमोपचार करून नंतर त्यांना शिरपूरहुन धुळ्याला हलवल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले


