सिद्धेश्वर नगरातील भिल वस्तीत मूलभूत सुविधा न पुरवल्यास आंदोलन
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा इशारा : पालिका प्रशासनाला निवेदन
वरणगाव : शहरातील सिद्धेश्वर नगरातील एकलव्य नगरातील भिल्ल वस्तीमध्ये भिल समाजबांधव अनेक वर्षापासून वास्तव्यास असतानाही नगरपरीषद त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्यामुळे भिल्ल समाजावर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करावा यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, डॉ.प्रवीणकुमार चांदणे, किरण भिल, गोकुळ भिल, सुभाष भिल, मिराबाई भिल यांच्यासह संपूर्ण भिल्ल बांधवांनी पालिकेवर धडक देत मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन दिले. सुविधा न पुरवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन
सिद्धेश्वर नगरातील भिल्ल वस्तीतील भिल्ल समाजबांधवांना शबरीमाता योजनेंतर्गत घरकुल मंजूर करावे तसेच वस्तीमध्ये समाज मंदिर, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईट , रस्ते आणि गटारी आदिवासी विभाग प्रकल्प यावल यांच्यामार्फत वरील कामांचा प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घ्यावा अन्यथा भिल समाजाच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदन देतेवेळी किरण भिल, गोकुळ भिल, सुभाष भोईर, मिराबाई भिल यांच्यासह भीमराज भिल, दीपक भिल, शोभाबाई भिल, रत्नाबाई भिल, सोनीबाई भिल, नर्मदाबाई भिल, अशोक भिल आदी समाज बांधवांनी दिला. यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी निवेदनकर्ते यांची बाजू ऐकून घेत भिल समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावल येथे जाऊन आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची भेट घेवून भिल्ल समाजबांधवांना मिळणार्या योजनेचा लाभ कसा देता येईल या बाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करणार असल्याचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी सांगितले.


