कौटुंबिक वादातून सासुला जावयाने विहिरीत ढकलले
वाडेगाव : जावई व सासुमध्ये झालेल्या वादानंतर संतप्त जावयाने सासुला मारहाण करीत विहिरीत ढकलले. ही धक्कादायक घटना वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या ढोरे यांच्या शेतात 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. चंद्रकला बळीराम डाखोरे (60) असे मयताचे नाव आहे तर आरोपी जावई विलास मारोती इंगळे पसार झाला आहे.
वादानंतर उचलले धक्कादायक पाऊल
बाळापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील शेतकरी ढोरे यांच्या शेतात जावई विलास मारोती इंगळे व सासू चंद्रकला बळीराम डाखोरे यांचे वाद झाले. यामध्ये जावयाने सासूला मारहाण केली. या वादाचे पर्यवसान होऊन जावयाने सासूला 60 फूट खोल विहिरीत फेकल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. घटनेबाबत स्थानिक शेतकर्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी सकाळी बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेतील आरोपी विलास मारोती इंगळे (35) पसार झाला.

