हिंगणघाटच्या प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळले : आरोपी तरुणाला न्यायालयाने ठरवले दोषी


हिंगणघाट : हिंगणघाट (Hinganghat) येथील अंकिता पिसुड्डे (Ankita Pisudde) या प्राध्यापक युवतीला जाळून मारल्याप्रकरणी आरोपी विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे (27) (Vikesh Nagrale) यास न्यायालयाने दोषी ठरवले असून गुरुवारी त्यास शिक्षा सुनावली जाणार आहे.

एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीला जाळले
दारोडा येथील रहिवासी अंकिता पिसुड्डे (Ankita Pisudde) ही हिंगणघाट (Hinganghat) येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 रोजी दारोडा येथून हिंगणघाट येथे आल्यावर महाविद्यालयाकडे जात असताना नंदोरी चौकात तिच्यावर आक्रीत ओढवले. दारोडा येथील रहिवासी विकेश नगराळे (Vikesh Nagrale)या माथेफिरू तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात ती गंभीररीत्या जळाली. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते मात्र 10 फेब्रुवारी 2020 रोजी अंकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अंकिताच्या (Ankita Pisudde) मृत्यूला 10 फेब्रुवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजाच्या केवळ 19 दिवसांतच 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले.

पेट्रोल टाकून जाळले
अंकिता पिसुड्डे (Ankita Pisudde) हिंगणघाटच्या (Hinganghat) स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता (Ankita Pisudde) आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते. 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी ती आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे (Vikesh Nagrale) दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले. गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत अंकिताला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु असताना आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले.

विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नेमणूक
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.उज्ज्वल निकम, अ‍ॅड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार, अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. बुधवारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले असून आता गुरुवारी त्याला काय शिक्षा मिळणार ? याकडे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !