पत्नीसह सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या सैन्य दलातील जवानाची आत्महत्या
पुणे : सैन्य दलातील जवानाने पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अवघ्या 24 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली. गोरख नानाभाऊ शेलार असे मयत जवानाचे नाव आहे. 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री जवानाने गळफास घेतला आहे. सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये तो कार्यरत होता. तो पुण्यातील वानवडी भागातील सैनिक आवासमध्ये वास्तव्यास होता.
पाच जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी पत्नीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. सासरचे पैशांची मागणी करत होते, तसेच त्रास देत होते, त्यामुळे सततच्या जाचाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 16 फेब्रुवारी 2021 मध्ये गोरखचे लग्न झाले होते. लग्नापासून त्याची पत्नी अश्विनी युवराज पाटील ही गोरखला मानसिक त्रास देत होती. तसेच तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो. तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो, असे ते म्हणत असल्याचे गोरखच्या भावाने सांगितले आहे तसेच सोडचिठ्ठी आणि 15 लाख रुपये दे, असे त्याच्या सासरचे गोरखला म्हणत होते. त्यामुळे शारीरीक आणि मानसिक त्रास देऊन माझ्या भावाला गळफास घेत आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले आहे, अशी माहिती गोरखच्या भावाने पोलिसांनी दिली आहे.

यांच्याविरोधात गुन्हा
या प्रकरणी गोरखची पत्नी अश्विनी युवराज पाटील, सासरा युवराज पाटील, सासू संगीता पाटील, मेहूणा योगेश पाटील आणि मावस मेहूणी भाग्यश्री पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे सर्वजण भावाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा दावा गोरखच्या भावाने केला आहे.
