मुक्ताईनगरात 22 वर्षांपासून क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत
मुक्ताईगर शहरातील क्रीडा प्रेमींमध्ये तीव्र नाराजी : आमदार चंद्रकांत पाटील यांनी दखल घेण्याची अपेक्षा
मुक्ताईनगर : तब्बल 22 वर्षांपासून शहरातील तालुका क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत आहे. संकुलाच्या पटांगणावर केलेले तात्पुरते ट्रॅक आता दिसत नसल्याने क्रीडाप्रेमींना हक्काचे मैदान नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे. राज्यात पोलिस भरती निघाली असून सरावासाठी मैदान नसल्याने आतातरी लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संकुलात अद्ययावत सुविधा नसल्याने क्रीडा प्रेमींनी मंगळवारी तालुका क्रीडा अधिकार्यांकडे नाराजी व्यक्त केली. तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष्य देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
22 वर्षांपासून क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत
1999 मध्ये मुक्ताईनगर येथे जिल्ह्यातील पहिले मंजूर तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले मात्र तब्बल 22 वर्ष उलटूनही ते अपुर्णावस्थेत आहे. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरात जिल्ह्यातील पहिले क्रीडा संकुल मंजुर केले होते. मुक्ताईनगर-भुसावळ रस्त्यावरील सालबर्डी फाट्यासमोर कोथळी शिवारातील गट नंबर 38 मधील एक हेक्टर दहा आर.जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी रुपये खर्चाचे क्रीडा संकुल बांधलेले आहे. तब्बल 22 वर्षांचा कालावधी उलटुनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण आहे. मध्यंतरी संकुलाची 50 ते 60 फुट अंतराची संरक्षण भिंतच जमीनदोस्त झाली होती. संबंधित ठेकेदाराने पडलेल्या भिंतीचे बांधकाम पूर्ण केले परंतु सहा महिन्यातच ती भिंत पुन्हा पडली तर संकुलाचे दुसर्या बाजुकडे देखील सुमारे 25 फुट अंतराचे संरक्षण भिंत पडलेली दिसून येते. संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्याने संकुल इमारतीच्या खिडक्यांची तावदाने तुटलेली असून मैदान सपाटीकरण, नवीन ट्रॅक, खो-खो मैदानाची आखणी झालेली नाही, संकुल मद्यपींसाठी अड्डा बनले आहे. संकुलातील बहुतांश कामे अपूर्ण असल्याने जिल्हा क्रीडा विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संकुलाचा ताबा घेतलेला नाही. आठ दिवसांपूर्वी शहरातील क्रीडा प्रेमी युवकांनी स्वत: संकुलातील कचरा व घाण साफ केली व संकुलाच्या दर्शनी भागात असलेल्या लोखंडी गेटला साखळदंडाचे सहाय्याने थोडी जागा सोडत कुलुप लावले म्हणजे संकुलाचे आत दुचाकी, चारचाकी वाहने जाणार नाहीत.
वेळोवेळी पत्रव्यवहार मात्र दखल नाही
तालुका क्रिडा समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार तर तहसीलदार कार्याध्यक्ष असतात. 9 सदस्य असलेल्या क्रिडा समितीने संकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याविषयी क्रीडा विभागाने सार्वजनिक बांधकाम उपविभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला असुन याचा उपयोग झाला नाही. 5 मे 2019 रोजी क्रीडा व युवक संचालनालय नाशिक चे उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी मुक्ताईनगरात येवून तालुका क्रीडा संकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा अधिकार्यांना क्रीडा संकुलाच्या अपूर्ण कामांचा अंदाजपत्रकांसह नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले तसेच अपूर्ण अवस्थेत असलेली कामे पुर्ण करण्याच्या सुचना केल्या होत्या परंतु तीन वर्षाचा कालावधी होत असून त्यास चालना मिळालेली नाही.
संकुल ‘बांधकाम’च्या ताब्यात
1999 मध्ये मंजुर ीमिळालेले जिल्ह्यातील पहिले तालुका क्रीडा संकुलाचे काम अपुर्णावस्थेत असल्याने क्रीडा विभागाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले नाही. निधी नसल्याने कामे रखडली आहेत शिवाय मानधन तत्वावर पहारेकरी ठेवण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षीत यांनी सांगितले तर संकुलाची संरक्षण भिंत पडलेली असून व अन्य कामांविषयी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर विभागाला पत्रव्यवहार केला असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी सांगितले.
पाच लाखांच्या साहित्याविषयी माहिती नाही
तालुका क्रीडा संकुलाला मंजुरी वेळी बांधकाम अंदाजपत्रकासह क्रीडा प्रेमी यांना खेळण्यासाठी अद्ययावत क्रीडा साहित्य घेण्यासाठी पाच लाख रुपयांची तरतुद आहे परंतु 22 वर्षापासून अपूर्णावस्थेत व कुठलीही सुविधा नसलेल्या या असुविधायुक्त तालुका क्रीडा संकुलात खेळाडुंना साहित्यच नाह परीणामी विविध खेळांचे सराव करतांना अडचणी निर्माण होतात. 5 लाखांच्या क्रीडा साहित्याविषयी माहिती नसल्याचे अधिकारी धरमाई यांनी सांगितले.


