वेल्हाळे शिवारात वीज तारांच्या शॉर्ट सर्किटने दहा लाखांचा ऊस जळून खाक
भुसावळ : वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने सुमारे दहा लाखांचा ऊस जळून खाक झाला. ही घटना वेल्हाळे, ता.भुसावळ शिवारातील गट क्रमांक 412, 414, 413 मध्ये शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडली. शॉर्टसर्किटमुळे ऊस पेटण्याची महिन्याभरातील ही तिसरी घटना घडल्याने शेतकरी महावितरणच्या कारभाराविरोधात संतप्त झाले आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
वेल्हाळे शिवारातील गट क्रमांक 413 रश्मी राणे, गट क्रमांक 414 मधुकर चौधरी व गट क्रमांक 412 आशाबाई पाटील यांच्या साडेसात एकर शेतामध्ये ऊस लावला होता. ही सर्व तिन्ही गटाची एकत्र शेती रमेश वामन राणे हे कसत आहेत. या संपूर्ण साडेसात एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. हा ऊस कापणी योग्य झाल्याने दोन दिवसानंतर या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी मजूर येणार होते. यामुळे या ठिकाणी साफसफाईचे काम सकाळी सुरू होते अचानक दहा वाजेच्या सुमारास डीपीवर शॉर्टसर्किट झाला. कोरड्या झालेल्या उसाला आग लागली व या आगीने रुद्र रूप धारण करून साडेसात एकर भागातील उसाला आपल्या भक्षस्थानी केले. साडेसात एकर शेतातील ऊस 70 पीव्हीसी पाईप, विहिरीवरील स्टार्टर व केबल असे जाळल्याने जवळपास नऊ ते दहा लाख रुपयाचे अंदाजे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाच्या तलाठ्यांनी केला आहे.
शेतकरी झाले संतप्त
वेल्हाळे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कविता सोनवणे यांना चार वेळेस भेटून डीपी व तारांमुळे शॉर्टसर्किट होत असल्याची माहिती देण्यात आली तसेच या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा शेतमालाचे नुकसान होणार असल्याची माहिती दिली होती परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षामुळे माझ्या शेतातील साडेसात एकर ऊसाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे महावितरणने संबंधीत जबाबदारांवर कारवाई करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वेल्हाळेचे शेतकरी रमेश राणे यांनी केली आहे.


