शिवशाही बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू
अहमदनगर : शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात शुक्रवारी सायंकाळी घडला. संजय क्षीरसागर (रा.पानोली, ता.पारनेर) व दादाभाऊ गाजरे (रा.राळेगणसिद्धी, ता. पारनेर) अशी मृतांची नावे आहेत.
रस्ता ओलांडताना धडक
राळेगणसिद्धी येथील आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय क्षीरसागर व माजी सरपंच रोहिणी गाजरे यांचे पती दादाभाऊ गाजरे शुक्रवारी कामानिमित्त नगर येथे गेले होते. नगर येथील कामे आटोपून दोघेही पुन्हा राळेगणसिद्धीकडे निघाले होते. वाटेत चास शिवारातील हॉटेलमध्ये ते जेवणसाठी थांबले होते. जेवण आटोपल्यावर ते राळेगणसिद्धीकडे परतण्याच्या तयारीत होते. रस्ता ओलांडत असताना नगरकडे जाणाऱया ’‘शवशाही’ बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. त्यात दोघेही दुचाकीसह फरफटत गेले.

दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर राळेगणसिद्धी, तसेच पानोली येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावरील मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. नगर येथे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारी गाजरे यांच्यावर राळेगणसिद्धी येथे, तर क्षीरसागर यांच्यावर पानोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
क्षीरसागर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
सहा महिन्यांपूर्वी संजय क्षीरसागर यांच्या मुलाचे आजराने निधन झाले. तरुण मुलाच्या अकाली निधनामुळे हे कुटुंब खचलेले असतानाच, कुटुंबप्रमुख संजय क्षीरसागर यांचेही अपघातात निधन झाल्याने क्षीरसागर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
