विकासकामांवरून जि.प.सदस्य-विरोधकांमध्ये जुंपली
विकासकामे केल्याचा पाल-केर्हाळा गटाच्या जि.प.सदस्यांचा दावा तर विरोधक म्हणाले ; विकासकामे कामे दाखवा
रावेर : पाल-केर्हाळा गटातील 20 गावांमध्ये गेल्या पाच वर्षात लाखो रुपयांची विकासकामे करण्यात आली तर कोरोनाच्या कठीण काळात मतदारांना मास्कसह सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आली तसेच गटात विविधांगी विकासकामे केल्याचा दावा जिल्हा परीरषद सदस्य नंदा पाटील यांचे पती अमोल पाटील यांनी केला आहे तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र विकासकामे केल्याचे दाखवा, असे खुले आव्हानच दिल्याने आगामी लढत येथे लक्षवेधी ठरेल, हे निश्चित आहे.
15 वर्षांपासून भाजपाचा जि.प.सदस्य
पाल-केर्हाळा गट गेल्या 15 वर्षांपासून भाजपाकडे आहे. या गटावर आदिवासी बांधव त्या खालो-खाल गुजर मराठा धनगर समाजाचा प्रभाव आहे. इतर अल्पसंख्यांक समाजाची मते देखील येथे निर्णायक आहे. 2017 मध्ये येथून भाजपाकडून जिल्हा परीषदेत नंदा पाटील यांनी काँग्रेस उमेदवार सुशीला जाधव यांचा पराभव करून निवडून गेल्या होत्या. गटात विकासकामे केल्याचा दावा सदस्य नंदा पाटील करत असल्या तरी विरोधक म्हणताय गटात फारसे विकासकामे झालेली नाहीत. पाच वर्ष जनतेने त्यांना विकासकामे करण्याची संधी दिली परंतु त्यांना संधीचे सोने करता आले नाही. आदिवासी बांधव आजही जिल्हा परीषदेच्या अनेक योजनांपासून वंचित असल्याचा दावा विरोधक करत आहे. आदिवासी वस्त्यामध्ये अजुनही व्यवस्थित रस्ते केले नसल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून केला जात आहे. जिल्हा परीषद सदस्य पती अमोल पाटील यांच्याबद्दल होम ग्राउंड केर्हाळामध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे.


जिल्हा परीषद गटात 18 गावे
अद्याप जिल्हा परीषद गटाची रचना बाकी असली तरी भाजपाला मतांचा जोगवा आताच्या विद्यमान सदस्यांनी केलेल्या विकासकामांवरच मागावा लागणार आहे त्यामुळे आदिवासी बहुल झेड.पी. गट भाजपा पुन्हा कसा जिंकणार ? कोणाला येथून 2024 उमेदवारी मिळते? यावर विजयाची पुढची बरीच गणिते अवलंबून असणार आहे. काँग्रेसकडून हा गट जिंकण्यासाठी आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या गटात आता अठरा गावे असून सुधारीत रचनेनंतर यातील काही गावे तुटणार आहे.
चौरंगी होणार गटाची निवडणूक
अद्याप गट रचना व आरक्षण जरी बाकी असले तरी येथून कांग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. यंदा होणार्या जिल्हा परीषद निवडणुकीसाठी येथून शिवसेनातर्फे प्रवीण पंडीत, अनिल जगनाथ पाटील काँग्रेसतर्फे अर्जुन जाधव, मानसी पवार, गोंडु महाजन, भाजपाकडून अमोल पाटील, माजी उपसभापती महेश पाटील, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, माजी सरपंच राहुल पाटील, संदीप सावळे इच्छुक आहे.
गटातील मतदारांचा मात्र नाराजीचा सूर
‘जनशक्ती’ने गटातील रसलपूर, पाल, अभोडा, जीन्सी, केर्हाळा, अहिरवाडीत फेरफटका मारला असता जनतेच्या सुख-दुखाःत विद्यमान सदस्या नंदा अमोल पाटील येत नाही म्हणून काहीसा नाराजीचा सुर आहे. कोरोना काळात हातावर पोट असणार्या कुटुंबाकडे पाटील यांच्याकडून कोणतीही मदत झाली नसल्याचे काही मतदार सांगतात तर अनेक ठिकाणी रस्ते, गटारींची अवस्था बिकट आहे तर नंदा पाटील यांनी विकासकामे करण्यासह जनतेला कोरोना काळात मदत केल्याचा दावा केला आहे.
असा होता 2017 मध्ये जनादेश
पाल-केर्हाळा जिल्हा परीषद गटात 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा कडून नंदा अमोल पाटील यांना नऊ हजार 578 तर काँग्रेसच्या सुशीला अर्जुन जाधव यांना आठ हजार 225 तसेच शिवसेनेकडून मानसी महेंद्र पवार यांना तीन हजार 812 मते मिळाली होती.
