भुसावळात सदोष वीज बिलांमुळे महावितरणचे ग्राहक संतप्त
भुसावळ : शहरातील वीज ग्राहकांना अतिारीक्त वीज बिले दिली जात असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. वीज बिल भरले नाही या कारणास्तव विजेचे मीटर काढून नेण्याच्या वीज वितरण अधिकारी व कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. भुसावळ विभागातील वीज ग्राहक वीज वितरण कंपनी विरोधात संतप्त झाले असून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अयोध्या नगर, मोहित नगर, श्रीनगर, भोई नगर, गणेश कॉलनी, गोदावरी नगर, अष्टविनायक कॉलनी, खळवाडी परिसरातील ग्राहकांना चुकीची देयके देण्यात येत आहे.
महावितरणच्या अधिकार्यांना निवेदन
वारंवार सूचना केल्यावरही महावितरणने देयके दुरुस्त केलेली नाही. अशोक गिरधर नारखेडे, वैशाली प्रकाश खडसे, हेमराज ज्ञानदेव खडसे, सुमनबाई भागवत उंबरकर, गोकुळ गंगाराम लोखंडे, बी.एस.वाणी, विठठल तुकडू कोळी, जे.डी.मिस्त्री, विजय सूर्यभान पाटील, एन.एन.भंगाळे, संजय एकनाथ पाथरवट, देवेश अशोक सपकाळे या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने महावितरण अधिकार्यांना निवेदन सादर केले.


दोन दिवसात दुरुस्ती करावी
देयके दुरुस्त केल्याशिवाय भरणा करण्याचा आग्रह करू नये. परीसरातील ग्राहकांना देण्यात आलेल्या अवाजवी देयकांची दोन दिवसात दुरुस्ती करा अश्या सूचना प्रा.धीरज पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या. महाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेची बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता महत्वाची बैठक श्रीनगरात होणार आहे. परीसरातील ग्राहकांनी वीज देयकांच्या तक्रारी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन प्रा.धीरज पाटील, विशाल ठोके, मिलिंद उंबरकर, अमोल पाटील, सुरज चौधरी, देवेश सपकाळे यांनी केले आहे.
