मुंबईत 27 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परीषद
चाळीसगाव : मुंबई मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परीषद बारा बलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली 27 रोजी होत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत असलेल्या या परीषदेचे उद्घाटन ओबीसींचे नेते आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री विजयकुमार वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे.
विविध विषयांवर निर्णय होणार
या परीषदेमध्ये राज्यातील ओबीसी, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, मुस्लीम, व्हीजेएनटी, एसबीसी, आदिवासी, दलित, वंचित ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक , शैक्षणिक प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात येईल तसेच ठोस स्वरूपाचे ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत शिवाय या परीषदेमध्ये राज्यातल्या विविध गटात व पक्षात वाटल्या गेलेल्या ओबीसींना एकत्र आणण्याचे आणि त्यांचे संघटन बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय अराजकीय ओबीसी बहुजन परीषद स्थापन करण्यात येणार आहे .


उपस्थितीचे ओबीसी बांधवांना आवाहन
या परीषदेचे महत्व लक्षात घेवून राज्यातील ओबीसी, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, मुस्लीम, व्हीजेएनटी, एसबीसी, आदिवासी, दलित, वंचित ओबीसी बांधवांनी 25 फेब्रुवारीला मुंबईत होणार्या राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परीषदेला उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे राज्य प्रवक्ता किसनराव जोर्वेकर, सरचिटणीस चंद्रकांत गवळी (मालेगाव), राज्य कोषाध्यक्ष साहेबराव कुमावत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख मुकूंद मेटकर यांनी केले आहे.
