राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असा मारला टोला
जळगाव : औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. त्यातच कोश्यारी हे जळगावात आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमानंतर प्रसिद्धी माध्यमांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी राज्यपालांवर टिकेचे बाण चालवले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे गुरू आहेत. कुठलेही वक्तव्य करण्यापूर्वी इतिहासाचा अभ्यास करावा मगच वक्तव्य करावे, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
पालकमंत्री म्हणाले, आधी करावा इतिहासाचा अभ्यास
पालकमंत्री पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर कोणताही व्यक्ती मोठा नाही किंवा कुणी लहान नाही. त्यामुळे राज्यपाल असो की कुणीही असो, त्यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास करावा आणि मगच वक्तव्य करावे, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांना लगावला.


