भुसाळा पालिका निवडणूक रीपाइं (डेमोक्रॅटीक) पक्ष स्वबळावर लढणार
भुसावळ : आगामी नगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची भूमिका रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाने जाहीर केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात पालिका निवडणुकीत रेल्वे उत्तर वॉर्डातील तीन प्रभागात व अन्य चार प्रभाग मिळून सात प्रभागांमध्ये 14 उमेदवार पक्षातर्फे स्वतंत्र निवडणूक लढतील, असे साळवे यांनी सांगितले.
ज्वलंत प्रश्नांसह निवडणुकीला सामोरे जाणार
जिल्हाध्यक्ष विजय साळवे म्हणाले की, 2018 मध्ये रेल्वे उत्तर वॉर्डातील झोपडपट्टी हटवण्यात आली. या भागातील रहिवाशांचा पुर्नवन प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित आहे शिवाय शहरातील रस्ते, पाणी, गटारी, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांच्या विषयाला मतदारांपर्यंत घेवून जावून निवडणुका लढवण्यात येतील. शहरातील वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी व रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) या पक्षांनी एकत्र येवून रेल्वे उत्तर वॉर्डातील तीन प्रभागातील निवडणुका एकत्र येवून लढवाव्यात, असे आवाहनही विजय साळवे यांनी केले आहे. तीन पक्ष एकत्र न आल्यास स्वतंत्रपणे लढू, असेही ते म्हणाले.


यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा संघटक छोटेलाल हरणे, भुसावळ तालुकाध्यक्ष संदीप किशोर सपकाळे, शहराध्यक्ष सुनील जोहरे, शहर संघटक शशीकांत रायमळे, सरचिटणीस उमाकांत पठाडे, उपाध्यक्ष बाळू बोराडे, कोषाध्यक्ष जितू जैस्वाल, सचिव सुरेश भोसले, सुशील सुरेश गायकवाड, संतोष पाखरे, बाळू मगर, संदीप बद्रे, नरेंद्र म्हस्के, नितीन जाधव, गणेश मगरे आदी उपस्थित होते.
