सुखद धक्का : चोरी गेलेला मौल्यवान ऐवज परत मिळताच तक्रारदारांनी मानले पोलिस प्रशासनाचे आभार
आयजी डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्याहस्ते तक्रारदारांना चोरी गेलेला ऐवज मिळाला परत
भुसावळ : चोर्या, घरफोड्या होवून तपास लागत नसल्याची एरव्ही सर्वसामान्यांची ओरड असलीतरी चोर्या, घरफोड्यांसह अप्रिय घटनेनंतर मुद्देमालाची चोरी होवून आरोपी गजाआड झाल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमालाची रीकव्हरी होते व न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल तक्रारदाराला परत केला होता. असाच सुखद धक्का भुसावळात पोलिसांनी तक्रारदारांना दिला. वार्षिक परीक्षणासाठी आलेल्या आयजी डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्याहस्ते पोलिस उपअधीक्षक कार्यालयात सात तक्रारदारांना पाच मोबाईल, टॅबसह सोन्याचा ऐवज असलेला मुद्देमाल परत करण्यात आला.
तक्रारदारांना बसला मोठा सुखद धक्का
तक्रारदार विशाखा गौतम, मीनाक्षी चौधरी, रमेश सपकाळे, किशोर शाक्यमुनी, गिरीश मुनेश्वर, विनोद ढाके, धीरज उंबरकर यांना चोरी गेलेला मोबाईलस टॅब व सोन्याचा ऐवज अनेक वर्षानंतर परत मिळाल्याने त्यांना मोठा सुखद धक्काही बसला. या उपक्रमासाठी एपीआय रुपाली चव्हाण (वाचक), एपीआय प्रकाश वानखेडे, हवालदार नंदकिशोर सोनवणे, हवालदार संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर, शालिनी वलके, अश्विनी जोगी आदींनी परीश्रम घेतले.
कायदा हातात घेणार्यांची गय नाही : डॉ.बी.जी.शेखर
पोलिस प्रशासनावर हात उचलणार्यांना कायद्याच्या माध्यमातून सरळ करण्यात आले असून यापूर्वीच सहा जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली असून आगामी काळात आणखी काहींवर मोक्कान्वये कारवाई शक्य असून शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावीपणे पोलिस प्रशासन काम करेल, असा विश्वास नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी यांनी शहरात व्यक्त केला. भुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
भुसावळ बाजारपेठ ठाण्याची वार्षिक तपासणी
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांचे भुसावळात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्वागत केले. प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. विविध गुन्ह्यांची त्यांनी माहिती जाणून घेत दोन महिन्यांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना केल्या तसेच हद्दपारी, मोक्का आदींचे प्रस्ताव वाढवण्याच्या सूचनाही केल्या. बुधवारी सायंकाळी डीवायएसपी कार्यालयाची त्यांची पाहणी करीत विभागातील अधिकार्यांचे म्हणणे जाणून घेतले.


