भुसावळातील प्रभाग 22 मध्ये सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास पाणीपुरवठा अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासणार
भाजपा नगरसेवकांचा सत्ताधारी पालिकेला घरचा अहेर : अनियमित पाणीपुरवठा नगरसेवक ठरताय रोषाचे बळी
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये होणार्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे जनता त्रस्त झाली असून त्याचा रोष स्थानिक नगरसेवकांना सोसावा लागत आहे, पाणीपुरवठा करणार्या व्हॉल्व्हमनशी तब्बल सहा महिन्यांपासून संपर्क झालेला नाही, पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे यांना तक्रार केल्यानंतर ते मुख्याधिकार्यांकडे तक्रार करण्याचे सूचवतात या सर्व प्रकारामुळे नागरीकांचा रोष अधिक वाढत असून प्रभागात कधी सात दिवसाआड तर कधी दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने आठवडेभरात तक्रारीची दखल न घेतल्यास संतप्त नागरीक पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासतील, असा इशारा सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांनी गुरुवारी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, सत्ताधारी नगरसेवकांनी सत्ताधारी पालिकेला घरचा अहेर दिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वेळी-अवेळी होणार्या पाणीपुरवठ्याने नागरीक त्रस्त
नगरसेवक किरण कोलते यांच्या नेतृत्वात गुरुवारी अधिकारी लुंगे यांना दिलेल्या निवेदनानुसार, पालिकेकडून सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असलातरी प्रभाग क्रमांक 22 मध्ये मात्र दहा दिवसाआड वेळी-अवेळी पाणीपुरवठा होतो शिवाय त्याची कल्पना स्थानिक नगरसेवकांनाही दिली जात नाही त्यामुळे नागरीकांचा नगरसेवकांवरील विश्वास उडाला आहे. नितीन लुंगे यांना तक्रारीचे गांभीर्य राहिलेले नाही त्यामुळे तक्रारीची तातडीने दखल न घेतल्यास लुंगे यांच्या चेहर्याला काळे फासले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनावर प्रभागातील विशाल वानखेडे, मोहन सोनगीरे, मयूर जोशी, चक्रधर बुंदेले, जगन्नाथ वराडे, सचिन पाटील, लाला चौधरी, पंढरीनाथ बाविस्कर, डी.बी.चिमणकर यांच्यासह प्रभागातील 37 नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.
जनता आपल्यासाठी महत्वाची -किरण कोलते
ज्या जनतेने आपल्याला विश्वासाने निवडून दिले आहे त्या जनतेच्या समस्या सुटाव्यात हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकांची गैरसोय होत असेल तर जनतेच्या हितासाठी वेळोवेळी कितीही आंदोलने करावी लागली तरी पर्वा नाही, असेही भाजपाचे सत्ताधारी नगरसेवक किरण कोलते म्हणाले.
