कन्नड घाटात अपघात : पोलिस कर्मचार्यासह दोघे ठार
इंडिका कार व मोटरसायकल समोरा-समोर धडकले : मृतात चाळीसगावात शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्यासह मावसभावाचा समावेश
चाळीसगाव : भरधाव चारचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव-कन्नड रस्त्यावरील रांजणगाव फाट्याजवळ गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रल्हाद राठोड व त्यांचा मावसभाऊ रवींद्र राठोड यांचा मृत्यू झाला. जळगाव शहर पोलिस ठाण्यातून काही महिन्यांपूर्वीच चाळीसगावात पोलिस कर्मचारी प्रल्हाद राठोड (34) यांची बदली झाली होती. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते मावसभाऊ रवींद्र तुळशीराम राठोड (30, रा.भांबरवाडी ता.कन्नड) सोबत दुचाकीने बहादपूर लोंजे या आपल्या गावाकडे निघाले असताना रांजणगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणार्या कार (कएम.एच.19-ईबी.5770)ने जोरदार धडक दिली. यात प्रल्हाद राठोड व रवींद्र राठोड या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.
