राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलल्या : नगरपालिकांची प्रभाग रचना अखेर रद्द ; नव्याने होणार रचना !


मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न एकीकडे ऐरणीवर आला असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकांची तयारी सुरू केली होती मात्र आता राज्य सरकारने नवीन विधेयक संमत केल्यानंतर निवडणुकीचे अधिकार आपल्याकडे घेतल्याने आपसुकच निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. दरम्यान, निवडणुका लांबवणीवर पडल्याने ठिकठिकाणी नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या नगरपालिका प्रभागरचनाही त्यामुळे रद्द करण्यात आली आहे शिवाय त्याबाबत नवीन विधेयकाच्या राजपत्रात याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची रचना नव्याने होणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

निवडणुका पडल्या लांबणीवर
ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रमाचे वातावरण झाले होते तर मध्यंतरी नगरपंचायती आणि दोन जिल्हा परीषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच झाल्या होत्या. यानंतर सुप्रीम कोर्टाने आरक्षण देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारने नवीन विधेयक संमत करून इंपेरिकल डाटा जमा करण्यासाठी वेळ मिळण्यासाठी काही बाबींची तरतूद केली. यामुळे निवडणुका किमान सहा महिने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



नवीन प्रभाग रचना अखेर रद्द
गत आठवड्यात नवीन विधेयक संमत झाल्यानंतर याचे राजपत्र जाहीर करण्यात आले असून यातील पाचव्या अनुच्छेदमध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनांची सुरू असणारी प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केलेले आहे. यामुळे आता अलिकडेच जाहीर करण्यात आलेल्या नगरपालिकांच्या प्रभाग रचना रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा परीषद आणि पंचायत समित्यांच्या रचनांची प्रक्रिया सुध्दा आता थांबली आहे. दरम्यान, प्रभाग रचना आणि याची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने निवडणुका सहा महिने वा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पुढे ढकलल्या जातील हे स्पष्ट आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !