थेरोळा शिवारात गावठी हातभट्टी अड्डयावर कारवाई
मुक्ताईनगर : तालुक्यातील थेरोळा शिवारात (Therola Shivar) दोन ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु भट्टी सुरू असताना पोलिसांनी कारवाई करीत एक लाख तीस हजार रुपये रुपये किंमतीचे दोन हजार 450 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. थेरोळा शिवारात दारू गाळणार्या महादेव जग्गु बेलदार (55, थेरोळा) सह तर पूर्णा नदीकाठी दारू गाळणार्या संतोष रामभाऊ बगे (31, कुर्हा) यांना पकडण्यात आल्याने त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात (Muktainagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मुक्ताईनगचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, सहाय्यक फौजदार सादीक पटवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश मनुरे, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर, विजय पठार, सागर सावे, राहुल नावकर यांच्या पथकाने केली.
आमदारांनी विधानसभेत मांडला प्रश्न
मुक्ताईनगर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. आमदारांनी अवैध धंद्याविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.


