वीज कंत्राटी कामगारांचा मुंबईत 21 रोजी मोर्चा
भुसावळ : राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती या कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या विविध न्याय मागण्यांसाठी सोमवार, 21 मार्च 2022 रोजी कामगार आयुक्त कार्यालय, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पश्चिम, मुंबई येथून सकाळी 10 वाजता विधानसभेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कामगार सहभागी होणार आहेत.
या मागण्यांसाठी मोर्चा
आयुष्यभर कंत्राटी कामगार हा शिक्का पुसला जावून रानडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, 27 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन ऊर्जामंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कंत्राटदार विरहित व वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीची हमी मिळावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हजारो वीज कंत्राटी कामगार या मोर्चात सहभागी होणार असल्याचे महानिर्मिती महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) केंद्रीय उपाध्यक्ष सचिन भावसार यांनी कळवले आहे.


