जळगावातील भावंडांचा अपहरणाचा प्रयत्न : भुसावळातील तरुणाला अटक


जळगाव : शहरातील तांबापुरा भागातील तीन अल्पवयीन सख्या भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळातील अवधेश उदीत नारायण शर्मा (30, रा.शांतीनगर, भुसावळ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शर्मा याने रेल्वे स्थानकावर भीक मागण्यासाठी आलेल्या मुलांना टेडीबिअर देत चॉकलेट तसेच वॉटरपार्कला घेवून जाण्याचे आमिष दाखवून पळविण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तांबापुरा परीसरातील गौतम नगरातील अल्पवयीन मुले 31 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर भीक मागण्यासाठी आल्यानंतर अवधेश उदीत नारायण शर्मा याने तिघां भावंडांना खेळणे घेवून देण्यासह वॉटर पार्क फिरविणे व चॉकलेट देईल असे आमिष दाखवत तिघांना रेल्वेतून मनमाड, तसेच भुसावळपर्यंत फिरविले.

जळगाव रेल्वे स्थानकावरुन घेतले ताब्यात
तीनही मुले घरी न आल्याने कुटुंबीयांकडून शोधही सुरु होता. त्यानुसार काही जण शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचले. गुन्हा दाखल करत असताना तीनही मुले रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रामकृष्ण पाटील, होमगार्ड पंकज भापकर, प्रशांत शिंदे, होमगार्ड वंदना मिस्तरी यांच्यासह रेल्वे स्थानक गाठले. तेथून मुलांसह त्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नातील संशयित अवधेश शर्मा यास ताब्यात घेतले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !