तीन सराईत अट्टल घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात
नाशिकरोड : नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेवुन 60 ग्रॅम सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने असा 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्हेगारांनी एकूण सात गुन्हे केल्याचे उघड झाले असुन यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पास्ते येथील फॉर्म हाउसमध्ये झालेल्या घरफोडी देखील उघड झाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नाशिकरोड परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीसांकडुन सतत प्रयत्न होत आहेत. पोलीस नाईक यांना काही सराईत गुन्हेगार हे जेलरोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तपास केला. घरफोड्या, चोरी करणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार अर्जुन गोरख धोत्रे (रा. सिन्नर) हा त्याच्या साथीदारांसह गुन्हा करुन जेलरोडला त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती उघड झाली. यावेळी पोलीसांनी जेलरोड भागात कॅनॉल रोड येथे सापळा लावला. यावेळी आरोपी अर्जुन धोत्रे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलत विविध गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. साथीदार आदित्य शिंदे (डुबेेरे), करण घुगे (रा.सिन्नर) हे सहभागी असल्याचे सांगितले.

सात गुन्ह्यांची उकल
गुन्हेगारांनी चेहडीतील एका घरामध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी केल्याचे कबुल केले. या गुन्ह्यातील दोन लाख 31 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले तसेच नांदुरनाका येथे बंदुकीचे दुकान, इंदीरानगर येथे चांदीचे दुकान, म्हसरुळ येथे दोन मोटार सायकल, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या फॉर्म हाउसमध्ये एल. सी.डी, रामनगरी भागातून अॅक्टीव्हाची चोरी केल्याचे कबुल केले. या गुन्हयाचा तपास योगेश पाटील, अविनाश देवरे हे करीत आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गणेश न्हयायदे, योगेश पाटील, जयेश गांगुर्डे, अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विशाल पाटील, अविनाश देवरे, विष्णु गोसावी, संदीप बागल, राकेश बोडके, केतन कोकाटे, कुंदन राठोड यांनी आरोपींच्या मुसक्या बांधल्या.
