बंटी-बबली दाम्पत्याने घातला 35 लाखांचा गंडा
नाशिक : कापड व्यवसायात रक्कम गुंतविल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने एका इसमास 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. स्वत:च्या फायद्यासाठी विश्वासघात करून आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
35 लाखांचा घातला गंडा
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी प्रकाश दत्तात्रय सहाणे (वय 53, रा. गौरव पार्क, शरणपूर रोड, नाशिक) यांच्याशी आरोपी सुनीता मनोज माहेश्वरी व मनोज प्रकाश माहेश्वरी (पत्ता माहीत नाही) यांनी संगनमत करून संपर्क साधला. दरम्यान, माहेश्वरी दाम्पत्याने सहाणे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना विश्वासात घेऊन कपड्यांच्या व्यवसायात मोठी रक्कम गुंतविल्यास तुम्हाला जादा रकमेचा फायदा करून देतो, असे प्रलोभन दाखविले. सुनीता माहेश्वरी व मनोज माहेश्वरी यांच्यावर विश्वास ठेवून सहाणे यांनी 1 मार्च 2018 ते 1 सप्टेंबर 2019 यादरम्यानच्या कालावधीत येवलेकर मळा येथील गंगोत्री अपार्टमेंटमधील 1 व 2 नंबरच्या शॉपमध्ये माहेश्वरी यांना 35 लाख रुपयांची रक्कम दिली.

अखेर पोलिसात गुन्हा
बरेच दिवस होऊनही सहाणे यांना दिलेल्या पैशाचा जादा मोबदला मिळत नसल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी माहेश्वरी दाम्पत्याकडे विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सहाणे यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली व तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या फसवणूकीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
