धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत पोलिसांनी धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवणार्या चोरट्यांना अटक केली आहे. पिंपळगाव बसवंत शहरातील जुना आग्रारोड पोलीस वसाहतीपासून गावाकडे जाणार्या सुरेखा कृष्णा धोंडगे (47, रा.घोडके नगर, पिंपळगाव बसवंत) सदर महिलेच्या गळ्यातील जवळपास 60हजार किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीवरून लांबवल्याची घटना 16 फेब्रुवारी रोजी घडली होती.
गोपनीय माहितीवरून अटक
पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सदर सीसीटीव्ही फुटेज नगर जिल्ह्यात तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर महिनाभरातच आरोपी संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले. या आरोपींना संगमनेर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. पोलिसांनी खाक्या दाखवला असता आरोपी अविनाश देविदास केंदळे (27, रा.नायगाव, ता.सिन्नर) व सोनू विश्वनाथ पवार (22, रा.नायगाव, ता.सिन्नर) यांनी पिंपळगाव शहरात महिलेची पोत ओरबाडल्याची कबुली दिली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, अधिक तपास करत आहे. अटक प्रसंगी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, अमोल जाधव, संदीप दराडे, मिथुन घोडके, नंदू जाधव, बंटी रिकामे, आदींसह होमगार्ड उपस्थित होते.
