विरोधकांच्या शिमग्यानंतर राज्य सरकारने बदलली नियमावली : जाणून घ्या नेमकी बातमी
मुंबई : राज्यात धुलिवंदन धुमधडाक्यात साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण होळी, धूलिवंदनसाठी राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नसून यासाठीची गृहखात्याने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत तसेच नवी नियमावली जाहीर केली आहे.
विरोधकांचा सरकारच्या नावे शिमग्यानंतर बदलली नियमावली
होळी-धूलिवंदनाच्या दिवशी 10 वाजेच्या आत होळी पेटवा, डीजे लावू नका, लाऊडस्पीकर हळू आवाजात लावा, अन्यथा कारवाई करू, अशा जाचक नियमावलीविरोधात विरोधकांनी आघाडी सरकारच्या नावे ‘शिमगा’ करताच गृह विभागाला 24 तासांच्या आत नियमावली बदलावी लागली. कोरोनाचे संक्रमण आटोक्यात असले वा कमी झाले असले तरी संक्रमण अद्याप सुरूच आहे हे लक्षात घेत नागरिकांनी होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साजरी करताना गर्दी करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. 17 मार्च होळी, 18 मार्च धूलिवंदन आणि 22 मार्चच्या रंगपंचमीसाठी गृह विभागाने गुरुवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

- काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?
- कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
- धूलिवंदनाला एकमेकांवर रंग टाकला, लावला जातो परंतु, कोरोना वाढू नये म्हणून हे सण साधेपणाने साजरे करावेत.
एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी - होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
हिंदूंच्या सणांवर निर्बंधानंतर भाजपाची टिका
भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर हिंदूंच्या सणांवर काही निर्बंध लादल्याप्रकरणी मोठी टीका केली होती. हिंदूंच्या सणांवर का निर्बंध लादता, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला होता. त्यानंतर गुरुवारी गृह विभागाने नवे पत्रक जारी करून गर्दी न करता सण साधेपणाने साजरे करण्याचे पत्रक काढले.
