मूलभूत सोयी-सुविधा न पुरवल्यास रास्ता रोको आंदोलन छेडणार
प्रांताधिकार्यांच्या अखत्यारीत येणार्या भागातील रहिवाशांचा इशारा : माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूरांच्या नेतृत्वात निवेदन
भुसावळ : प्रांताधिकार्यांच्या अखत्यारीत येणार्या भागात मूलभूत सोयी-सुविधा न पुरवल्यास रास्ता राको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरीकांनी प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला. माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्या नेतृत्वात सोमवारी निवेदन देण्यात आले.
मूलभूत सोयी-सुविधांपासून नागरीक वंचित
या परीसरातील श्रद्धा नगर, साईनाथ नगर, पत्रकार कॉलनी, शासकीय वस्तीगृह व इतर रहिवासी भागात डांबरी रस्ते, विद्युत पुरवठा व गटारीचे बांधकाम पूर्ण नसल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या भागात नागरीक वास्तव्यास आहेत. सुमारे बाराशे ते पंधराशे लोक येथे राहतात. या परिसरातील नागरीक नगरपालिका निवडणुकीत मतदान करतात मात्र हा भाग प्रांताधिकारी यांच्या अखत्यारीत असल्याने कुठलीही विकासकामे या भागात होत नाही. या परीसरात रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही, दिवाबत्तीची सुविधा नाही, पावसाळ्यात रहिवाशांना बाहेर निघणे कठीण होते, जागोजागी महावितरणच्या विद्युत वाहिन्या जमिनीपासून 10 ते 12 फूट अंतरावर असल्याने नुकताच दोन तरुणांचा बळी गेला तर नागरीकांच्या जिवीतास मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा परीसरनगरपालिका हद्दीत येत नसल्याने नगरपालिका लक्ष देत नाही व नगरपालिका हद्दीबाहेर असल्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. या भागात गटारी, रस्ते, दिवाबत्ती व अन्य सुविधा मिळणेही कठीण झाले आहे.



मृत तरुणांच्या वारसांना मदतीची मागणी
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांना महावितरण व प्रशासनाने आर्थिक मदत करावी, रस्ते,गटारी, व विज तारांचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा अन्यथा जामनेर रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना जे.टी.बरकले, पी.जी.गोरे, जी.बी.राजपूत, ए.पी.पवार, संजय डी.पाटील, लोकेश पाटील, योगेश शिंदे, रीतेश राजपूत, मधुकर निंभोरे, पंकज राजपूत, गजानन सोनवणे, विजय सोनवणे, मुसाखा तडवी, संदीप ठाकूर, अमोल हिरे, मधुकर निंभोरे, पी.एन.दोदानी, आर.जी.सोनवणे, डी.पी.बाळू पाटील, विजय तायडे, एम.डी.सावळे, पी.व्ही.बाळापूरकर, एस.पी.पाटील, दीपक राणे, डॉ.उमेश पाटील, रोशन पानझोप, सचिन घाटे, नंदू घाटे, पिंटू पाटील आदी उपस्थित होते.
