भुसावळात चोरटे सैराट : चार दुकानांचे कुलूप तोडले
भुसावळ- पोलिसांच्या गस्तीला भेदून शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गांधी पुतळ्याजवळील मनोज ऑटोपार्टसह चार दुकानांचे कुलूप चोरट्यांनी तोडले मात्र शटरचे सेंट्रल लॉक न उघडल्याने सुदैवाने लाखोंची चोरी टळली. पहिल्या चोरीत अपयश आल्यानंतर चोरट्यांनी किशोर टेन्ट हाऊसकडे मोर्चा वळविला मात्र तेथील एकच कुलूप तुटले तर दुसरे तुटले नाही. त्यानंतर चोरट्यांनी तु.स. झोपे विद्यालयाजवळील विजय ऑप्टीकल्स या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडत दुकानातील चष्म्याच्या काही फ्रेम लांबवल्या तर पाटील ऑप्टीकल या दुकानाच्या बाजूला असलेल्या दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने कुलूप चोरट्यांकडून तुटले. शहर पोलिसांनी चारही ठिकाणी भेट देत चोरीबाबत माहिती जाणली मात्र रक्कम गेली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.