नागणचौक जंगलातून दोघे शिकारी जाळ्यात
जामनेर पोलिसांनी कामगिरी : दोन संशयीत पसार पसारर : दोन बंदुकांसह 48 मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन तसेच काळविट व निलगायीचे मांस जप्त
जामनेर : जामनेर तालुक्यातील नागनचौक जंगलात सोमवारी पहाटे पाच वाजता काही जण वाहने व बंदूका घेऊन नीलगाय व काळवीटची अवैधरित्या शिकार करीत करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने सोमवारी पहाटे केलेल्या कारवाईत महेमूद मोहम्मद अबीद (45) व अन्सारी सोद मोहमद अबीद (32, दोन्ही रा.धुळे) दोघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन बंदुका, 48 मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन, काळवीट व निलगायीचे मांस जप्त केले आहे. या कारवाईत हर्षद ड्रायव्हर (रा.अकबर चौक, धुळे व उस्मान शहा (रा.नाचणखेडा, ता.जामनेर) हे पसार होण्यात यशस्वी झाले तर संशयितांच्या वाहनाचा पाठलाग करतांना पोलिसांचे वाहन उलटल्याने यात एक जखमी झाला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिकार्यांबाबतची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांना कळवून सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक विकास पाटील, सहायक फौजदार जयसिंग राठोड, ईस्माईल शेख, राहुल पाटील, सचिन पाटील,अमोल घुगे, प्रदीप पोळ यांना सोबत घेऊन तात्काळ नागनचौकी जंगल गाठले. वाडीकिल्ला येथील पोलीस मित्र विलास पाटील व गावकर्यांची मदत घेवून संशयितांना घेराव घातला. नागनचौकी जंगलात संशयितांना घेरल्यानंतर दोन जण वाहन सोडून जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले तर अन्य दोघं जणांनी चारचाकीतून (एम.एच.02 जे 9760) पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला असता ही चारचाकी रस्त्यात उलटली, त्यात अन्सारी सोद मोहमद अबीद याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला. त्याचा दुसरा साथीदार महेमुद मोहम्मद अबीद याला पकडण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून 25 हजार रुपये किमतीची 22 मि.मि.रायफल (दुर्बिणीसह), 30 हजार रुपये किमतीची 306 मि.मि.रायफल (दुर्बिणीसह), दीड हजार रुपये किमतीचे 22 मि.मि.रायफलचे 22 जिवंत काडतुस व 11 खाली राऊंड, दोन हजार 600 रुपये किमतीचे -306 रायफलचे 13 जिवंत राऊंड व 2 खाली राऊंड, एक लाख 20 हजार रुपये किमतीची चारचाकी, सात हजार रुपये कंपनीचा मोबाईल, 15 किलो 107 ग्रॅम वजनाचे एक काळवीट प्राण्याचे मांस, 78 किलो 440 ग्रॅम वजनाचे निलगाय प्राण्याचे तुकडे ( दोन्ही मांसाची किमंत 1,86,100/- रुपये) तर एकूण तीन लाख 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



