प्रक्षाळ पुजेने संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याची सांगता
101 कुमारीकांसह भाविकांनी मुक्ताईची केली पूजा
मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (725 वे वर्ष) सोहळ्याची सांगता सोमवारी सकाळी प्रक्षाळ पुजेने करण्यात आली. पौरोहित्य विनायक महाराज व्यवहारे, राम जूनारे, संकेत महाराज निपाणेकर (कोथळी) यांनी केले.
राज्यसभेतील तीन जागांवर भाजपाचा विजय निश्चित : माजी मंत्री गिरीश महाजन
देवस्थानावर प्रक्षाळ पूजा
संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा नुकताच बुधवार, 25 मे 2022 रोजी पांडूरंग परमात्मा (पंढरपूर), रुक्मिणी माता (कौडीण्यपुर), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत निवृत्तीदादा (त्र्यंबकेश्वर) पालखी सोहळे व जळगाव, धुळे, नाशिक, बुलढाणा, अकोला तसेच विदर्भातील इतर असंख्य जिल्हे व मध्यप्रदेशातील लाखो भाविक व वारकर्यांच्या उपस्थितीत झाला. महोत्सव दरम्यान, आई साहेबांचे नित्य उपचार बंद असतात त्यामुळे वारीनंतर प्रत्येक देवस्थानावर प्रक्षाळ पूजा केली जाते. यानुसार आदिशक्ती मुक्ताईची प्रक्षाळपूजा संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी करण्यात आली.

आता दैनंदिन नित्यउपचार
यावेळी संपूर्ण गाभारा स्वच्छ करून, मंदिर पाणी अभिषेकाने स्वच्छ केले तसेच आईचा क्षीण भाग जाण्याकरीता गरम पाणी, उटणे, आयुर्वेदीक काढे, लोणी, दही, दूध, पाणी, चंदन उटी, गुलाब जल वापरून स्नान घालण्यात आले. उपस्थित 101 कुमारीकांसह भाविकांनी मुक्ताई च्या मूर्तीस लिंबू , साखर लावण्यात आली. पंचामृताने पवमान सुक्त व मंत्रोच्चारात अभिषेक सोहळा पार पडला. तद्नंतर आरती व महानैवेद्य देण्यात आला. या प्रक्षाळ पुजेनंतर आता आईसाहेबांचे दैनंदिन नित्यउपचार चालू होतील, अशी माहिती हभप उध्दव महाराज जूनारे यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी कोथळीचे मंदिर व्यवस्थापक ह.भ.प उध्दव महाराज जूनारे, ह.भ.प पंकज महाराज, ह.भ.प.चेतन महाराज, ह.भ.प.दुर्गा संतोष मराठे, ह.भ.प. संजय महाराज (लालबाग), ह.भ.प.संतोष महाराज चौधरी, नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, गणेश आढाव आदींसह असंख्य भाविकांची उपस्थिती होती. यावेळी भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात आला.