भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची दमदार कामगिरी : शहर ठरतेय शस्त्र विक्रीचे जंक्शन
भुसावळ : शहरातील स्टेशन चौकीनजीक एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीस अटक केली. शुक्रवारी सकाळी 9.45 वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सतीश रमेश सपकाळे (21, रा.रमाबाई आंबेडकर नगर, अकलुद, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरुन कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नाईक नरेंद्र चौधरी, यासीन पिंजारी, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. आरोपी सतीश रमेश सपकाळेविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच 500 रुपये किंमतीचे काडतूस जप्त करण्यात आले. तपास पोलिस नाईक नरेंद्र चौधरी करीत आहेत.




