भुसावळातील उद्योगपतीला गंडवले : आरोपीचा अटकपूर्व फेटाळला


भुसावळ :  शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व नगरसेवक मनोज बियाणी यांना शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून 90 लाख रुपयात फसवल्याप्रकरणी अकोल्यातील उद्योगपती तथा आरोपी विवेक रामराव पारस्कर (रा.तोष्णिवा ले आऊट, अकोला) व प्रॉपर्टी ब्रोकर उमेश कन्हैय्यालाल लाठी (साई सदन, रणपिसे नगर, अकोला) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सप्टेंबर 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी पारस्कर यांनी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर गुरुवारी न्या.एस.पी.डोरले यांनी तो फेटाळला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी लाठी यांना यापूर्वीच अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

शेतजमीन अस्तित्वात नसताना फसवणूक
संशयीत आरोपी जमीन आपल्या नावावर करून देत नसल्याने मनोज बियाणी यांचा संशय बळावल्यानंतर त्यांनी 27 जुलै 18 रोजी खडका तलाठी कार्यालयात जावून शेत गट क्रमांक 168-169 यांचे उतारे मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर सर्वे नंबर 1 ते 137 असल्याचा दाखला मिळाला व त्यावेळी शेतजमीन सर्वे क्रमांक 168 ही अस्तित्वात नसताना ती अस्तित्वात असल्याचे दाखवून आपली आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींनी बनावट सही, शिक्क्यांद्वारे शेतजमिनीच्या इसार्‍या पावतीपोटी 90 लाखांची रक्कम हडपली. तर संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी बियाणी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने दिली तसेच आपल्यावर सिव्हिल लाईन, अकोल्यात पाच गुन्हे दाखल असून माझ्याकडे गुंड लोक आहेत, तुमच्या कुटुंबाला संपवू, अशी धमकीदेखील दिल्याचे बियाणी यांनी त्यावेळी तक्रारीत नमूद केले होते.




आरोपीचा जामीन फेटाळला
या गुन्ह्यातील आरोपी लाठी यांना यापूर्वीच अटक करण्यात आल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती तर पारस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यांनी अतिरीक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अकोल्याचे अ‍ॅड.एस.एस.जोशी यांच्यामार्फत 18 रोजी अर्ज केल्यानंतर गुरुवार, 21 रोजी न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे सुनावणी झाली. याप्रसंगी सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण भोंबे यांनी अटकपूर्व जामिनास हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. आरोपीतर्फे अ‍ॅड.अनिकेत निकम तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.प्रवीण भोंबे यांनी बाजू मांडली. तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !