Midterm Elections Anytime : Be Prepared! MLA Eknath Khadse मध्यावधी निवडणुका केव्हाही लागणार : तयार रहा ! आमदार एकनाथ खडसे
सज्जन व उच्च शिक्षीत आमदारांकडून कामांवर स्थगिती आणण्याचे कारनामे
Midterm Elections Anytime : Be Prepared! MLA Eknath Khadse मुक्ताईनगर : सज्जन व उच्चशिक्षीत आमदार मतदारसंघात आलेला विकासाचा निधी परत नेतात, कामांवर स्थगिती आणतात, आपण मराठा समाजाला मुक्ताईनगरात एक एकर जमीन दिल्याने आमदारांनी तेथे समाज मंदिर बांधले नाही, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख टाळून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सडकून टिका केली. यावेळी त्यांनी हे सरकार काही जास्त दिवस चालणार नसल्याचे सुतोवाच करीत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खडसे फार्म हाऊसवर झालेल्या विधानसभास्तरीय बैठकीत ते बोलत होते.
पक्षाची विस्तृत आढावा बैठक
मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तृत आढावा बैठक आमदार एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगरात रविवारी झाली. यावेळी मुक्ताईनगर तालुक्याबरोबर बोदवड तालुक्यातील जिल्हा परीषद पंचायत समिती गट गणाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणीचा आढावा, जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणूक आढावा, जिल्हा परीषद गट गण प्रमुख नेमणूक करणे, बूथ रचना, राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेस संघटनात्मक आढावा या सह इतर संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्यात आला.


राष्ट्रवादी सुसंवाद यात्रा
अॅड.रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या की, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनापासून राऊतझिरा, ता.बोदवड येथून राष्ट्रवादी सुसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात येईल व 26 नोव्हेंबरला मुक्ताई मंदिर येथे यात्रेचा समारोप होईल. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, येत्या काळात नगरपालिका, जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटना आणखी मजबूत करायची आहे त्यासाठी बूथ रचना मजबुत करा, सभासद नोंदणी करा जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी अधिक होणार मजबूत
जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाची स्थिती मजबूत झाली असून आगामी काळात त्यांच्या माध्यमातून जिल्हयात जास्तीत जास्त आमदार निवडून येतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शंभर टक्के यश मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
जनहिताच्या निर्णयांना सरकारकडून स्थगिती
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन जे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे ते दोन लोकांचे स्थगिती सरकार आहे . जनहिताच्या अनेक निर्णयांना या नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात अनेक भागात पुरसदृश्य परीस्थिती असून सरकार मंत्री मंडळ विस्ताराच्या बैठका घेण्यात व्यस्त आहे. जनतेच्या समस्यांशी सरकारला देणे घेणे नाही. आपण विरोधी पक्षात असलो तरी जनतेत जाऊन समस्या जाणून घ्या त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या 30 वर्षात आमदार असून कधीच धर्माचे, जाती-पातीचे राजकारण केले नाही, आजचे आपल्या मतदारसंघाचे आमदार हे आपण आणलेल्या विकास कामांवर स्टे आणणारे आमदार असून गेल्या काळात आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांवर त्यांनी स्टे आणल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, रमेश नागराज पाटील, प्रा.डॉ.सुनील नेवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार (मुक्ताईनगर), तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, युवक तालुकाध्यक्ष राजेश ढोले, सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, शहराध्यक्ष राजु माळी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर , विलास धायडे, विकास पाटील, प्रदीप साळुंखे, किशोर गायकवाड, किशोर चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.