भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात माझ्या रावेरचेही योगदान

सर्वाधिक शिक्षा मिळालेले स्वातंत्र्यसैनिक कै जनार्दन रामचंद्र नाईक : वैद्य उर्फ जनुभाऊ


दिलीप वैद्य, रावेर

Amrit Mahotsav of Indian Independence: My Raver’s contribution to the freedom struggle of the country रावेर  : स्वातंत्र्यपूर्व काळात रावेर शहरातील असंख्य युवकांनी प्रेरणा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वेच्छेने उडी घेतली होती. त्यापैकी रावेर येथीलच मूळ रहिवासी जनार्दन रामचंद्र नाईक – वैद्य यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अगदी साधी राहणी, उंचपुरी आणि मध्यम शरीरयष्टी, तेजःपुंज चेहरा, अंगात खादीचा नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर गांधी टोपी असा त्यांचा पेहराव. व्यवसायाने वैद्य म्हणून त्यांना जनुभाऊ वैद्य म्हणूनही काही जण ओळखत.

घरातूनच मिळाले राष्ट्रभक्तीचे बाळकडू
जनूभाऊ यांचा जन्म 5 डिसेंबर 1914 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रावेर येथेच झाले तर माध्यमिक शिक्षण पुणे येथील अनाथ विद्यार्थी गृहात झाले. धुळे येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली तर 1937 मध्ये त्यांनी अहमदनगर येथून आयुर्वेदतीर्थ ही विशारद पदवी संपादन केली. जनुभाऊ एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांना त्यांच्या आत्यानेच लहानचे मोठे केले. जनु भाऊंच्या घरची आर्थिक स्थिती सर्वसाधारणच होती परंतु घरातूनच त्यांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू मिळाले होते. पुणे येथील अनाथ विद्यार्थी गृहात देखील तेथील संस्थापक दादासाहेब केतकर यांनीही त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत जागवली. पुणे येथे राहत असतानाच जनुभाऊंनी त्यावेळी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत तिरंगा घेऊन वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. त्यावेळी पुणे पोलिसांनी त्यांना पकडले आणि एक दिवस पोलीस ठाण्यात ठेवून विद्यार्थी आहेत म्हणून सोडून दिले. तेथून रावेर येथे परत आल्यावर त्यांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय होण्याची इच्छा झाली. त्यापूर्वी रावेर येथीलच गोविंद भाऊराव वैद्य, राम लखन भैय्या, प्रबुद्ध शास्त्री आणि तात्या काका सोनार ही मंडळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जाऊन आलेली होती. त्यापासून प्रेरणा घेत जनुभाऊंनीही स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले.

रेल्वे रूळ काढल्याने शिक्षाही भोगली
1942 मध्ये देशात इंग्रजांविरुद्ध ‘करेंगे या मरेंगे’ ही चळवळ सुरू झाली. इंग्रजांच्या दळणवळणाच्या साधनात अडथळे निर्माण करण्याची योजना स्वातंत्र्य सैनिकांनी आखली आणि तालुक्यातील वाघोड रेल्वे स्थानकानजीक रेल्वेचे रूळ उखडून रेल्वे पाडण्याचे ठरविण्यात आले. त्याचे नेतृत्व जनुभाऊ नाईक – वैद्य, रामभाऊ भोगे यांच्याकडे आले. त्यावेळी रावेर शहर आणि परिसरातील एल.जी.चौधरी, सीताराम वाणी, फालक, महाजन, पंडित आणि बोदवड येथील एक सुतार नामक युवकांनी याची जबाबदारी स्वीकारली आणि रेल्वेचे रूळ काढून ते फेकून दिले.त् यासाठी रावेर येथील बारभाई जीनचे पान्हे व अवजारांचा वापर करण्यात आला. यावेळी मागून येणार्‍या पंजाब मेलचे चार डबे रुळावरून घसरले. या प्रकरणाची चौकशी झाली, बोदवड येथील सुतार नामक युवकाने पोलिसांना यात सहभागी युवकांची नावे सांगितली आणि जनु भाऊंना इंग्रज पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांना 6 वर्ष 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. ही शिक्षा त्यांनी रावेर, धुळे, नाशिक आणि पुण्यातील येरवडा तुरुंगात भोगली. जनुभाऊ तुरुंगात असताना साने गुरुजी त्यांच्या घरी पोहोचले होते आणि वैद्य कुटुंबियांना त्यांनी हिंमत देऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्या काळात देशाच्या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागल्याने 1946 मध्येच इंग्रज सरकारने त्यांची मुदतपूर्व सुटका केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनुभाऊंनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतले. खानदेश वैद्यक संघाचे ते अध्यक्ष झाले आणि त्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. 1972 मध्ये केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनी त्यांना ताम्रपत्र देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या पत्नी इंदिराबाई नाईक यांचेही या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना साथ देण्याचे मोलाचे योगदान होते.

वरणगावात झाले निधन
जनूभाऊंना 2 मुले आणि 5 मुली होत्या. सखाराम उर्फ श्याम जनार्दन नाईक (निवृत्त शिक्षक, महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव), गोविंद उर्फ रमण नाईक (डोंबिवली), कै सिंधुबाई जोशी (बदलापूर), श्रीमती प्रभाताई पानट (डोंबिवली), श्रीमती पद्माबाई श्रीकृष्ण जोशी (वरणगाव), कै वृंदा कुलकर्णी (भुसावळ) आणि श्रीमती नंदिनी जठार (टिटवाळा) ही त्यांची अपत्ये होत. आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस जनुभाऊ त्यांचा मोठा मुलगा शिक्षक असलेल्या वरणगाव येथे होते. त्यांचे निधन 16 नोव्हेंबर 1999 ला वरणगाव येथेच झाले. आपले घर हे एका स्वातंत्र्य सैनिकाचे स्मृतीस्थळ व स्फूर्ती स्थान व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !