राज्यातील रेशन दुकानदारांच्या समस्यांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य स्वस्त भाव दुकानदार व परवानाधारक महासंघाच्या वतीने
भुसावळ (26 एप्रिल 2026) : शेगाव येथे शुक्रवार, 24 एप्रिल रोजी माजी मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दौर्यावर आले असता त्यांना राज्यातील 55 हजार रेशन दुकानदार बांधवांच्या विविध समस्यांबाबत न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वस्त भाव दुकानदार परवानाधारक महासंघ पदाधिकार्यांनी शेगाव येथे भेट घेतली. रेशन दुकानदारांना कमिशन संदर्भात अडचणी असून, सन्मानाने जगता येईल एवढे कमिशन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील रास्त भाव दुकानदार संघटनेची बैठक बोलावून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. ’रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत मी सकारात्मक आहे. याबाबत मी मुख्यमंत्री यांना विनंती करणार असून याबाबत लवकरच बैठक लावली जाईल. अशी आपल्याला ग्वाही देतो असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्यांना दिले आहे.

यावेळी शेगाव तालुकाध्यक्ष पहुरकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय टिळक तसेच राज्य महासंघाचे उपाध्यक्ष राजेश अंबुसकर व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील रास्त भाव दुकानदारांना मागील अनेक महिन्यांपासून त्यांचे मार्जिन कमिशन नियमितपणे मिळत नाही. दुकानदारांना धान्याचा पुरवठा वेळेवर उपलब्ध होत नाही राज्यातील साखळी व्यवस्थापन प्रणाली पूर्णता ढासाळलेली असून विकेंद्रीत धान खरेदी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार वाढलेला आहे. मंत्री कार्यालयापासून ते मंत्रालय स्तरापर्यंत तसेच क्षेत्रीय यंत्रणेमध्येही या बाबींचा प्रभाव दिसून येत आहे परिणामी दुकानदारांना वेळेवर मार्जिन मिळत नाही तसे त्यांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.
