प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव : पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ


जळगाव (26 एप्रिल 2026) : अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या तिस-या दिवसाचा शुभारंभ रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्याहस्ते करण्यात आला.

महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी मुलांसाठी बालचित्रपट महोत्सवात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. शुभारंभप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते संस्कारांचे माध्यम देखील आहेत. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना चांगल्या विषयांची ओळख होते. आजच्या चित्रपटाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास मुलांपर्यंत पोहचणार आहे.

तिनही दिवसात बालचित्रपट महोत्सवात दाखवलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचा अनोखा संगम आयोजकांनी घडवून आणला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, पालकशाळेच्या डॉ.वीणा महाजन यांच्या हस्ते पोनि गुंजाळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ.सुचित्रा लोंढे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, डॉ. सचिन कुंभार, कमलाकर रुगे,गणेश देसले,पालक शाळेचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, डॉ.विद्या पाटील, शैलेश शिरसाठ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनंत पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शैलेश शिरसाठ तर आभार श्वेता जैन यांनी मानले. यावेळी प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी घेतलेल्या गाणी व खेळांच्या माध्यमातून मुलांना संस्कारक्षम मुल्यांची माहिती देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आग्र्याच्या कैदेतून केलेली सुटका, हा भारतीय इतिहासातील अत्यंत रोमहर्षक अध्याय आहे. हाच इतिहास नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडणार्‍या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाने महोत्सवात उपस्थित असलेल्या बालप्रेक्षकांना खिळवून ठेवले. शिवरायांची बुद्धिमत्ता, साहस आणि स्वराज्यनिष्ठा यांचे दर्शन या चित्रपटातून घडले. या चित्रपटातील प्रसंगांना जमलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा देत या सादरीकरणाचा आनंद घेतला. केवळ मनोरंजनच नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती मुलांना मिळावी, या उद्देशाने या चित्रपटाची निवड आयोजकांनी केली होती.

बालचित्रपट सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधनेचे कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, पालकशाळेचे डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, डॉ. विशाखा पाटील, मकरंद डबीर, अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्थ डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, अनघा गोडबोले, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ.सुचित्रा लोंढे, बालरंगभूमी परिषदेचे सदस्य आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे, हर्षल पवार, पंकज बारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिग्पाल लांजेकर यांच्या या ऐतिहासिक चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादामुळे महोत्सवाची रंगत अधिकच वाढली असून, या उपक्रमामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणि बालविकासाच्या उपक्रमात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मनोगत अनेक पालक व शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !