चाकू हल्ला करीत 90 हजारांची रोकड लांबवली
सुळे रीगाव रस्त्यावरील घटना : फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यास लुटले
मुक्ताईनगर : खाजगी फाईनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्यावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी करून भरदिवसा त्याच्या जवळील 90 हजार रुपये दोघा चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना रीगाव सुळे रस्त्यावर घडल्याने एकच खळबळ उडाली. जळगाव जामोद येथील क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) या खासगी फाईनान्स कंपनी चा वसुली अधिकारी मिथिल बाबाराव लाठे (22) हा बुधवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मांडवा (जि. बुलढाणा) व रीगाव येथून वसुलीचे पैसे गोळा करून त्याच्या दुचाकीने सुळे-वढोदा मार्गे जळगाव जामोद येथे जात होता. यावेळी लाल रंगाच्या सीडी डिलक्स गाडी (क्र. एमएच 28 एवाय 9059) या दुचाकीवरून दोघा विशीतील तरूण तोंडावर रुमाल बांधून आले आणि मिथिल लाठे याच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लावून त्याचा रस्ता अडविला. काही कळायच्या आत दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने लाठे याच्या मानेला चाकू लावून पैशांची मागणी केली मात्र लाठे याने त्याच्या हाताला झटका मारून निसटण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्याच्या पोटावर चाकूने हल्ला केल्यामुळे तो जखमी झाला आणि त्याच्या हातातील बॅग हिसकून दोघा चोरट्यांनी पोबारा केला. बॅगेत 90 हजार रुपये रोख व काही महत्वाची कागदपत्रे होती.
शेतकर्यांची धाव
यावेळी आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी ज्ञानदेव पाटील, सुरेश पाटील, सागर गोंगे, सागर इंगळे यांच्या सदर बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी जखमी लाठे कडे धाव घेतली. सुळ्याचे पोलीस पाटील उमेश बाठे यांनी पोलिसात खबर दिली. कुर्हा पोलीस चौकीचे सुरेश पवार व भगवान पाटील यांनी घटनास्थळ गाठून शेतकर्यांच्या मदतीने जखमीस कुर्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर डॉ. रविंद्र सोनावणे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालय येथे रवाना केले. त्यानंतर सहाय्यक फौजदार माधव पाटील, संदीप खंडारे, संजय लाटे, मेजर संतोष कातरे यांनी घटनास्थळी जावून चौकशी केली तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पो नि सुरेश शिंदे, पीएसआय निलेश साळुंखे यांनी सुद्धा घटनास्थळ गाठून शेतकर्यांकडून घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय निलेश साळुंखे करीत आहे.



गडबडीत चोरटे घसरले
मिथिल लाठे याच्या जवळील 90 हजाराची बॅग हिसकावून पोबारा करत असतानाच काही अंतरावर गेल्यानंतर चोरट्यांची दुचाकी घसरली. अपघात झाला असे वाटल्याने आजूबाजूच्या शेतकर्यांनी धावत जात त्यांना उचलले. त्यानंतर सदर चोरटे गाडी सुरु करून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पूर्वनियोजित कट
वसुली करून मिथिल लाठे जेव्हा रीगाव येथून सुळे रस्त्याने जायला निघाला तेव्हा रिगाव मध्ये सदर चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर उभे असल्याचे त्याने बघितले मात्र त्याच्या मनात पुढील घडणार्या घटनेची पुसटशी कल्पना सुद्धा आली नाही. सदर चोरट्यांनी चिंचखेडा खु. या गावात सुद्धा फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकारी विषयी चौकशी केल्याची चर्चा आहे.
