रावेरात 13 रोजी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव
रावेर : शहरातील श्री दत्त जयंतीला सुमारे 180 वर्षांची अखंड परंपरा असून श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव कार्यक्रम हजारो भाविकांच्या साक्षीने सात दिवस चालणार आहे. यामध्ये गुरुवार, 12 रोजी दत्त मंदिरात श्री गुरुदेवदत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होईल तर शुक्रवार, 13 रोजी श्री रथाची महापूजा करून रथ ओढण्यात येणार आहे. यानिमित्त सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शनिवार, 14 रोजी श्रींच्या पालखीचे महापूजा करून दहीहंडी फोडण्यासाठी मिरवणूक निघणार आहे .
कृष्णभावनामृत संघातर्फे हरी कृष्ण संकीर्तन
श्री दत्त जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थान असल्याने नोकरी व कामानिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी रथोत्सव निमित्त आवर्जून गावाकडे परततात. या रथोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे हरी कृष्ण संकीर्तन होणार आहे. या संकीर्तनसाठी मुंबईसह इतर ठिकानावरून भक्त रावेरात येणार असल्याचे मंदिरातर्फे सांगण्यात आले.



शिर्डीच्या साईबाबांच्या सांगण्यावरुन दासगणु आले रावेरात
श्री दत्त मंदिरातील कार्यक्रमांचे आमंत्रण देण्याची पध्दत असून श्री मस्तानशाह बाबा, श्री कुंवरजी महाराज, श्री संत रामबाई व श्री स्वामी महाराज एका पंक्तीत प्रसादाला बसत असे. श्री साईबाबा हे महाराजांच्या वृध्दापकाळात महाराजांना भेटण्यासाठी रावेरात 1882 च्या कालखंडात श्री साईबाबांच्या सांगण्यानुार श्री दासगणु महाराजांनी रावेर येथे येवून श्री सतगुरु सच्चिदानंद स्वामींचे लिलामृत लिहिले ते व दत्त मंदिरात उपलब्ध आहे. श्री सतगुरु सच्चिदानंद स्वामींनी वयाच्या 108 व्या वर्षी दत्त प्रभुंच्या चरणी संजीवन समाधी घेतली. श्री स्वामीनंतर रावेर येथे स्वामींच्या समाधीच्या दर्शनास गाडगेबाबा, श्री झिपरुअण्णा, श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंभेस्वामी), श्री नरसिंव्ह सरस्वती (आळंदी), श्री संत तुकडोजी महाराज अशा भगवंत स्वरुप संतांनी रावेर येथे येवून महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाले व या भूमीला याही संतांची चरणाची धूळ लाभली तसेच रावेर येथे प्रसिध्द असलेल्या मठामध्ये श्री रामस्वामी महाराजांचे समाधीस्थान असल्याचे येथील श्री दत्त मंदिर संस्थाचे ऋषिकेश महाराज यांनी सांगितले.
आठवडाभर असा चालणार कार्यक्रम
रविवार, 8 रोजी दत्तात्रेय भगवान यांच्या मूर्तीवर अभिषेक पूजन, श्रीमद् भागवत गीता पाठ व कीर्तन, सोमवार, 9 रोजी हभप राजेश महाराज बंभाडेकर यांचे कीर्तन, मंगळवार, 10 रोजी ध्वज पूजन, कोठी पूजन,स्थापना व कीर्तन, बुधवार, 11 रोजी श्री दत्त यज्ञ, दत्त मलामंग संकीर्तन स्वाहाकार व कीर्तन, गुरूवार, 12 रोजी श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव सोहळा व अरुण सुगंधीवाले यांचे भजन, शुक्रवार, 13 रोजी रथाची महापूजा, रथाची भव्य मिरवणूक, शनिवार, 14 रोजी श्रींच्या पालखीची मिरवणूक, दहिहंडी सोहळा रथोत्सवाची सांगता होईल.
रेवड्यांची होते उधळण
श्री दत्त जयंतीनिमित्त प्रसाद म्हणून गुळासह तीळाद्वारे तयार करण्यात येणा-या रेवड्यांची रथोत्सव मिरवणुकीवर उधळण केली जाते. यासाठी महाराष्ट्रभर नोकरीनिमित्त गेलेले रावेरकर शहरात येतात तसेच प्रसाद म्हणून अनेक भाविक रेवड्या प्रसाद म्हणून नेत असतात.
