वरणगाव शहरात ‘आनंदाचा शिधा’ तातडीने व्हावा वितरण
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची पुरवठा अधिकार्यांकडे मागणी
भुसावळ : राज्यातील शिंदे सरकारने शंभर रुपयांत एक किलो, रवा, साखर चणा डाळ या आनंदाचा शिधा किटचे दिवाळीत वाटप करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला असलातरी वरणगावात योजनेतील पात्र लाभार्थींना अद्यापपर्यंत वितरण करण्यात आले नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे. आनंदाचा शिधा किटचे वरणगाव शहरात लवकर वाटप करण्यात यावे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली.
तत्काळ किट वाटपाच्या सूचना
भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रताप दिव्य वीर यांची निवेदन देताना उपस्थिती होती. पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाला भ्रमणध्वनीवरून वरणगाव शहराला त्वरीत आनंदाचा शिधा किटचे वाटप करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.
