15 हजारांचे लाच मागणी प्रकरण : सावद्यातील सहाय्यक निरीक्षकासह उपनिरीक्षकाला एक दिवसाची पोलिस कोठडी
15,000 bribe demand case: One-day police custody for assistant inspector and sub-inspector भुसावळ : सावदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी सावद्यातील सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (52, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (32, रा.सावदा, ता.रावेर) यांना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. संशयीत आरोपींना बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
जळगाव तालुक्यातील 42 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आकाश कुमावतविरोधात सावदा पोलिसात अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी गुरनं.0136/2022 भादंवि 363, 376 (2), (एन) पोस्को व कायदा कलम 4 अन्वये 24 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आकाश यास 27 ऑगस्ट 2022 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार हे आपल्या मुलास भेटण्यासाठी सावदा पोलिसात गेल्यानंतर संशयीत आरोपी तथा पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी मुलीला तुमच्या घरी आणल्याने तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल व आरोपी करावयाचे नसल्यास 60 हजारांची लाच पंचांसमक्ष मागण्यात आली होती मात्र 15 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती मात्र संशय आल्याने आरोपींनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर वरीष्ठांच्या आदेशान्वये मंगळवारी सकाळी आठ वाजता दोघा संशयीतांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


भुसावळ न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
दरम्यान, बुधवारी दुपारी दोघा संशयीतांना भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.