भुसावळात तालुक्यात चार महिन्यात 62 दुचाकींची चोरी
चोरटे शिरजोर : भुसावळ शहर व तालुक्यातील वाहनधारक वाढत्या चोर्यांनी त्रस्त
62 two-wheelers stolen in four months in Bhusawal Taluka भुसावळ : शहर, बाजारपेठ व तालुका हद्दीतून गेल्या चार महिन्यात सुमारे 62 दुचाकींची चोरी झाल्याने दुचाकी वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे घराबाहेर लावलेली दुचाकी लांबवत असून दुचाकींचा शोध लागत नसल्याने चोरट्यांचे अधिक फावले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे आधीच दुचाकी परवडेनासी झाली असून त्यातच आता महागड्या दुचाकी लांबवल्या जात असल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
शहरासह परीसरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टोळीतील सदस्य दुचाकींची चोरी करून त्यांची मध्यरात्रीतच विल्हेवाट लावत असताना पोलिस प्रशासनाला मात्र चोरट्यांचा शोध अद्यापपर्यंत लावता आला नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कृतीबाबत संताप व्यक्त होत आहे. भुसावळ भेटीवर आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे सुतोवाच केले असून किमान यापुढे दुचाकी चोरींच्या प्रकारांना आळा बसण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.

