बालिवूडच्या कलाकारांवर मनसेने ओढला टिकेचा आसूड
लानत है उनपर, जिनके पास दानत नही है…. अमेय खोपकर
मुंबई : लानत है उनपर, जिनके पास दानत नही है…. असे म्हणत मनसेनं बॉलिवूड कलाकारांना फटकारलं आहे. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असं सांगणारे बॉलिवूड कलाकार पश्चिम महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटकाळात कुठे आहेत ? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमाचं प्रदर्शन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही ? बॉलिवूड कलाकरांना कर्मभूमीच विसर पडलाय, याचा संताप होतोय, असे म्हणत अमेय खोपकर यांनी मनसेच्यावतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बॉलिवूड कुठं गेला ?
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे मात्र मुंबई अन् महाराष्ट्रातून जगभर पसरणारा बॉलिवूड कुठं गेलाय ? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे. आता, मनसेने याबाबत प्रश्न विचारला आहे. समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत? असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी विचारला आहे.