जळगावातील एस.टी.वाहकाला मारहाण : आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा


जळगाव : एस.टी.वाहकाला मारहाण करीत त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणार्‍या जळगावातील संशयीतास जळगाव न्यायालयाने सहा महिने सक्त मजुरीसह पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भुसावळ आगाराचे वाहक दीपक रामकृष्ण बडगुजर (भुसावळ) व त्यांच्या सोबतचे चालक अनिल उत्तम पाटील (एम.आय.डी.सी.जळगाव) यांना कर्तव्य बजावत असताना संशयीत नवनाथ आसाराम शिंदे (रामनगर, जळगाव) यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर सोमवारी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
भुसावळ एस.टी. डेपोचे वाहक व चालक हे 26 एप्रिल 2018 रोजी त्यांचे ताब्यातील भुसावळ-सुरत ही एस.टी. बस घेवून भुसावळहून निघाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास एस.टी.बस खेडी पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर आरोपी नवनाथ आसाराम शिंदे याने त्याच्या ताब्यातील ज्युपिटर कंपनीची दुचाकी (एम.एच.19 सी.क्यू.0694) ही एस.टी. बसच्यासमोर आडवी लावली व बस अडवली. त्यानंतर बसमध्ये शिरून वाहकाला मारहाण करण्यात आली तसेच वाहकाच्या ताब्यातील टिकीट बुकींगचे पैसे एक हजार रुपये काढून घेण्यात आल्याने वाहक दीपक बडगुजर यांचे जबाबावरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.



जळगाव न्यायालयाने सुनावली शिक्षा
सरकारपक्षातर्फे सहा.सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. त्या साक्षीदारांपैकी वाहक व चालक तसेच पंच साक्षीदार विपुल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ.बिराजदार आणि तपास अधिकारी संभाजी त्रंबक पाटील यांचा जबाब महत्वपूर्ण ठरला. संपूर्ण साक्षीपुराव्याअंती अतिरक्ति जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद आर. पवार यांनी आरोपी नवनाथ शिंदे यास दोषी धरुन त्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड सुनावला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !