गृहकर्जाच्या हप्त्याच्या नावाने दहा लाख उकळले : सायबर पोलिसांनी खाती गोठवत दहा लाख रुपये परत मिळवले


10 lakhs stolen in the name of home loan installments: Cyber police recovers 10 lakh rupees by freezing accounts जळगाव : गृहकर्जाचा हप्ता मिळाला नाही, अशी थाप मारून भामट्यांनी तक्रारदाराची 10 लाखांची रक्कम उकळली. जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल होताच तांत्रिक तपासाअंती पश्चिम बंगालमधील दोन्ही खाती गोठवून सायबर पोलिसांनी दहा लाख रुपये परत मिळवले आहेत.

एचडीएफसी बँकेच्या नावाने केली फसवणूक
सतीश काळमेघ (वय 50) यांना 17 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. ‘एचडीएफसी बँकेच्या हाउसिंग लोन डिपार्टमेंटमधून बोलत असून, तुमचा लोनचा हप्ता कपात झाला नाही. आजच्या आज ऑनलाइन हप्ता नाही भरला तर जास्त दंड लागेल’ असे धमकावून काळमेघ यांना ऑनलाइन हप्ता भरण्यास भाग पाडले. त्यासाठी भामट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून अर्ज भरण्यास सांगितले. हा फॉर्म भरताच काळमेघ यांच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये परस्पर वर्ग झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळमेघ यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठले.

तक्रारदाराच्या खात्यात रक्कम वर्ग
पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे, सचिन सोनवणे व श्रीकांत सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच तांत्रिक तपासाला सुरुवात केली. काळमेघ यांच्या बँक खात्यातून एसबीआय, पश्चिम बंगालमधील एका खात्यात रक्कम वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन तासात सुरुवातीला नऊ व नंतर एक असे एकूण 10 लाख रुपये वर्ग झालेले दोन्ही बँक खाती पोलिसांनी गोठवून घेतले. त्यानंतर काळमेघ यांच्या बँकेशी संपर्क साधून ही रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा केली. दोन दिवसांनी काळमेघ यांना ही रक्कम परत मिळाली.

 


कॉपी करू नका.