अक्कलकुव्यातील जामिया शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्याचा निर्घृण खून


Heinous murder of a student at Jamia Educational Complex in Akkalkuwa अक्कलकुवा : शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी शाळेत इयत्ता आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा वर्ग मित्रानेच चाकूने भोसकून खून केला. मोबाईल चोरी केल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तर्की फैजुल उर रहेमान अब्दुल खालिक (15) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मोबाईल चोरीच्या संशयातून खून
अक्कलकुवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणार्‍या व जामिया वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या इयत्ता आठवीतील तर्की फैजुल उर रहेमान अब्दुल खालिक (15) याचा मोबाईल फोनची चोरी केल्याच्या कारणास्तव त्याच्याच वर्गमित्राने चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवार, 6 नोव्हेंबर रोजी नियमित शाळा सुटल्यानंतर दुपारी दीड वाजेनंतर ते रात्री नऊ वाजेच्या वाजेच्या सुमारास घडली. इंग्लिश माध्यमाच्या जुन्या शाळेच्या इमारतीतील मुलांच्या प्रसाधन गृहात आरोपी अल्पवयीन मुलाने तर्की फैजुलवर चाकूने मानेवर तसेच पोटावर वार केले. याबाबत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात या अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावीत करीत आहेत.

अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत फौजदार रीतेश राऊत, रमेश पाटील, महाजन, पोलीस कर्मचारी कपिल बोरसे, खुशाल माळी, किशोर वळवी, आदिनाथ गोसावी, कल्पेश कर्णकार, प्रशांत यादव, अविनाश रंगारी यांनी संशयीतला अटक केली.

प्रथमच घडली घटना
मयत विद्यार्थ्यावर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयत मुलाच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. अक्कलकुवा शहरातील जामिया शैक्षणिक संकुलात प्रथमच अशी खळबळ जनक घटना घडल्याने संपूर्ण संकुलामध्ये शोककळा पसरली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारे हे दोन्ही एकाच वर्गात शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे दोन्ही गुजरात राज्यातील रहिवासी असून मयत हा अहमदाबाद येथील तर आरोपी हा सोनगड येथील रहिवासी आहे.


कॉपी करू नका.