पहूर-शेंदुर्णीदरम्यान स्कूल बस उलटून 30 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी
School bus overturned during Pahur-Shendurni, 30 students and two teachers injured जळगाव : शेंदुर्णीतील विद्यालयाची बस विद्यार्थ्यांना शाळेत आणत असताना अचानक वाहनाचा पाटा तुटल्याने नियंत्रण सुटून झाडावर आदळली. या अपघातात 30 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी सात वाजता पहूर-शेंदुर्णीदरम्यानच्या घोडेश्वर बाबाजवळ घडला. अपघातानंतर नागरीकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले असून सर्वांची स्थिती साधारण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यालयात बस येत असताना अपघात
शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिराची बस (एम.एच.19 वाय 5778) ही शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन विद्यालयाकडे येत असताना पहूर- शेंदुर्णीदरम्यान घोडेश्वर बाबाजवळ अचानक वाहनाचा पाटा तुटल्यानंतर अनियंत्रीत होवून झाडावर आदळली तर धडक इतकी जोरदार होती की झाडाचेही तुकडे होवून बस उलटली. या अपघातात बसमधील 40 पैकी 30 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले तर दोन शिक्षकही जखमी झाले.

नागरीकांची तातडीने घटनास्थळी धाव
अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या अपघातामुळे वाहनातील विद्यार्थी आणि शिक्षकांना काही वेळ काहीच सूचले नाही. स्कूल बस आदळल्यानंतर बसमधील विद्यार्थ्यांनी मोठ-मोठ्याने आरडाओरड केल्यानंतर नागरीकांच्या मदतीने विद्यार्थी बसबाहेर आले. पालकांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खाजगी वाहनांनी काही जखमींना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मोठी दुर्घटना टळली
स्कूल बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैव बलवत्तर असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बसचा पाटा तुटेपर्यंत वाहनाची तपासणी का झाली नाही? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आरटीओ प्रशासनाने जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करण्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.