नशिराबाद जि.प.शाळेची संरक्षण भिंत अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू
नशिराबादमधील घटना : दोषींवर गुन्हे दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
A child died after the protection wall of Nashirabad district school fell on him नशिराबाद : शाळा आवारात खेळताना अचानक संरक्षक भिंत अंगावर पडलयाने 13 वर्षीय चिमुकल्याचा दबून जावून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नशिराबाद गावातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता घडली. या घटनेत मोहित योगेश नारखेडे (13, अळी नशिराबाद, ता.जळगाव) याचा मृत्यू ओढवला. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शाळा प्रशासन आणि बांधकाम करणर्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अचानक कोसळली संरक्षक भिंत
सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारा मोहित हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्या कारणामुळे तो घरी असल्याने शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत सनसवाडी रोडवरील जिल्हा पपरीषद प्राथमिक शाळा आवारात खेळत होता व त्याचवेळी शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालविली. मुलाचा मृत्यू झाल्याने आई-वडीलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदार याच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला होता.

मयताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई असा परीवार आहे. तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहे.