भुसावळ-जळगाव दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागाने इलेक्ट्रीक कामांना चालना देत गत मागील आर्थिक वर्षात भुसावळ ते जळगावदरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनचे (31.30 किलोमीटर) विद्युतीकरण काम पूर्ण केले असून जळगाव ते पाचोरा दरम्यानच्या थर्ड रेल्वे लाईनचेदेखील 50 किलोमीटर अंतरापर्यंत विद्युतीकरण पूर्ण केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. डीआरएम एस.एस.केडिया व इलेक्ट्रिक ट्रॅक्शन वितरण (टीआरडी ) विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता निखिल कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रीकलची कामे करण्यात आली आहे. भुसावळ ते जळगाव या नव्याने बांधलेल्या चौथ्या मार्गाचे रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, एकूण 31.30 किमी लांबीचे हे विद्युतीकरण असून नव्याने बांधलेल्या जळगाव ते पाचोरा नवीन तिसर्या मार्गाचे रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले. यात एकूण 50 किमी लांबीचे विद्युतीकरण करण्यात आले.
रेल्वे अपघात टळले
नव्याने सुरू करण्यात आलेले अंकाई येथे तयार करण्यात आलेल्या माल शेडचे सुध्दा नवीन विद्युतीकरण करण्यात आल्याने लोडींग, अनलोडींग केले जाते. बडनेरा गुडस् यार्ड लाईनीचे नवीन विद्युतीकरण माल लाईन्सच्या स्थिरीकरणासाठी करण्यात आले तसेच बडनेरा येथे आगामी नवीन वॅगन दुरूस्ती कार्यशाळेतील नादुरूस्त वॅगनच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान इलेक्ट्रिक ट्रेन ऑपरेशन (टीआरओ) विभागाचे प्रमुख वरीष्ठ विभागीय विद्युत अभियंता अर्शद आलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात विविध ठिकाणी कामे करण्यात आल्यानंतर रेल्वे अपघात टळले असून गतवर्षी 2021-22 मध्ये लोको पायलटने रेड सिग्नलवर ट्रेन गेल्याने चार छोटे अपघात झाले मात्र यंदा 2022-23 वर्षात रेल्वेच्या लोकोपायलटकडून अशा कोणत्याही चुका झाल्या नाहीत. रेड सिग्नल ओलांडल्याची बाबही घडलेली नाही.
