‘बार्टी’च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी केले शासन निर्णयाचे स्वागत


Fellowship for ‘Barty’ students : Bhusawal MLA Sanjay Savkare welcomed the government’s decision भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)च्या वतीने राज्यातील 861 विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्यानंतर या निर्णयाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी स्वागत केले आहे. बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्या वतीने ‘पीएच. डी.’ साठी दिल्या जाणार्‍या फेलोशिपकरीता समान धोरण तयार करण्यात येणार असल्याने यापुढे फेलोशिपकरिता आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महाविकास आघाडीमुळे आली आंदोलनाची वेळ
प्रदीर्घ काळ रखडलेल्या या मागणीसाठी आंदोलने उभी राहिली, पण शिक्षणाबाबत कोणतेच ठोस धोरण नसलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न प्रलंबीतच राहिला त्यामुळेच विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली, असा आरोप आमदार संजय सावकारे यांनी केला. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या धोरणामुळे संशोधनास चालना मिळेल असा विश्वासही आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला. फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरही सरकार सकारात्मक तोडगा काढेल, असेही ते म्हणाले.

जनहितासाठी गतिमान कारभार
ग्रामीण भागातील दिव्यांग आणि पालावर राहणार्‍या कुटुंबांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याच्या सरकारच्या योजनेचेही आमदार संजय सावकारे यांनी स्वागत केले. राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर छप्पर असावे ही सरकारची भावना असून जनहिताच्या मुद्यावर सरकारने गतिमान कारभारास प्राधान्य दिले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !