महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 11 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू

मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा अजित पवार यांचा आरोप


11 Shree members died of heatstroke during the Maharashtra Bhushan Award ceremony रायगड : रणरणत्या उन्हातच रविवारी खारघरात पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात तब्बल 11 सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ठाकरेंसह पवारांची सरकारवर टिका
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. नागपूरमधील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपवून रात्री 1.30 वाजताच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील होते. या तिघांनी रुग्णालयातील श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी सत्ताधार्‍यांवर देखील टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा सवाल ठाकरेंनी केला. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. उन्हाळा असताना भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. तसेच रुग्णांची आणि मृतांची संख्या उघड झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले.

आठ मृतांची ओळख पटली
मृतांपैकी 8 मृतांची ओळख पटली आहे. त्यात वायचळ, तुकाराम वांगडे, महेश गायकर, मंजुषा भाबंडे, स्वप्नील केणे, संगीता पवार, जयश्री पाटील, भीमा साळवी अशी मृतांची नावे आहेत. उर्वरीत तीन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.दरम्यान, रात्री उशिरा 11 मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक मृतदेहासोबत एक माणूस व गाडी सरकारतर्फे देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचे नातेवाईक गावी घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

नियंत्रण कक्षाची स्थापना
बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी हरवले व सापडले समितीचे प्रमुख 7977314031 व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 022-27542399 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !